Monday, July 12, 2010

रितेपणावर जगताना...

मध्यंतरी जॉन झरझन या अमेरिकेतील एका विचारवंताचे "Running on Emptiness" नावाचे एक पुस्तक वाचायला मिळाले आणि एक कोंडी फुटल्यासारखे वाटले. वाढते शहरीकरण, अफाट वेगाने वाढणारी लोकसंख्या, तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराचा आवळत चाललेला फास आणि एकंदरच पर्यावरण, जीवसृष्टी, समाज आणि नातेसंबंध इत्यादींचा होत चाललेला ऱ्हास याबद्दलच्या माझ्या अस्वस्थतेला आणि विचारांना एक आधार मिळाल्यासारखे झाले. मानवी नागरीकरणाबद्दल (civilization) मूलभूत असे विचार या पुस्तकात मांडले गेले आहेत. माणसाला निसर्गापासून तोडणारी आणि त्याचे शोषण करणारी ही श्रमविभाजनावर आधारित समाजव्यवस्था हेच मानवाच्या नागरीकरणाचे आणि तथाकथित उन्नतीचे फलित आहे. दिवसेंदिवस माणसांच्या अंतरंगातला रितेपणा वाढत चालला असून निसर्गापासून दूर गेल्याने एक प्रकारच्या पोरकेपणाची आणि एकटेपणाची भावना वाढीस लागली आहे. औद्योगिक प्रगती साधलेल्या आणि सर्व भौतिक सुखे हात जोडून उभ्या असणाऱ्या अमेरिकेसारख्या देशांमध्येच याचे प्रमाण जास्त आहे हेच पुरेसे बोलके आहे. शेती करायला लागण्यापुर्वी लाखो वर्षे मानव निसर्गाशी एकरुप होऊन राहत होता. छोट्याछोट्या टोळ्यांमध्ये राहून भटकत, शिकार करत आणि अन्न गोळा करत मनुष्यप्राणी इतर प्राण्यांसारखा निसर्गाच्या कुशीत सुखाने जगला. या लाखो वर्षांमध्ये युद्धे नव्हती, सामूहिक हिंसाचार नव्हता, साथीचे रोग नव्हते, जातिव्यवस्था नव्हती की वर्गवारीची उतरंड नव्हती. प्रत्येक मनुष्य स्वतंत्र आणि समान. प्रत्येक अनुभव जिवंत आणि थेट. नैसर्गिक निवडीच्या तत्त्वामुळे लोकसंख्याही आपोआप आटोक्यात असे. लाखो वर्षे ही जीवन पद्धती टिकली. पण दहा हजार वर्षांपुर्वी माणूस शेती करू लागला आणि त्यातून निर्माण झाल्या गरजा. कालमापनाची गरज, भाषेची गरज, श्रमशक्तीची गरज, तंत्रज्ञानाची गरज. एकेकाळी चक्रीय असणारा काळ हळूहळू एका रेषेत मोजला जाऊ लागला. शेतीच्या सोयीसाठी ऋतुंनुसार काळ मोजला जाऊ लागला आणि हळू हळू वर्ष, महिने, दिवस, तास, मिनिटे, सेकंद असं करत करत काळाची सूक्ष्मातिसूक्ष्म मापे अस्तित्वात आली. श्रमविभाजनातून इतराना नियंत्रित करण्यासाठी, इतरांचे श्रम मोजून त्या प्रमाणे मोबदला देण्यासाठी या कालमापनाचा फार उपयोग झाला आणि होतो. त्याचबरोबर भाषेचा विकास झाला. निसर्गात मिळणाऱ्या अनुभवाला एक शब्दरुपी ध्वनिचिन्ह बहाल करण्यात आले आणि हळूहळू या चिन्हानी मूळ अनुभवालाच विस्थापित केले. प्रत्येक गोष्ट शब्दबद्ध करण्याच्या धडपडीत तो पूर्वीचा थेट भिडणारा अनुभव नष्ट झाला आणि त्याचबरोबर नष्ट झाली ज्ञानेंद्रियांचा संवेदनशीलता. हळूहळू मग विनिमयाची गरज निर्माण झाली आणि व्यापार अस्तित्वात आला. केवळ पोट भरण्यापुरते अन्न मिळवणे संपून इतर वस्तू मिळवण्यासाठी आणखी आणखी उत्पादन करण्याची गरज निर्माण झाली. आणखी उत्पादनासाठी आणखी श्रमशक्ती, म्हणून आणखी शोषण. मानवी आणि इतर पाळीव प्राण्यांची श्रमशक्ती पुरेना म्हणून मग यंत्रं आणि ती यंत्र चालवण्यासाठी माणसांचं यांत्रिकीकरण आणि एकजिनसी आयुष्याची गरज.आता तर अशी अवस्था आहे की प्रत्येक नैसर्गिक गोष्टीला एका मानवनिर्मित चिन्हाने विस्थापित केलं आहे आणि आपण सगळे एका मानवनिर्मित चिन्हांच्या दुनियेत राहत आहोत, निसर्गापासून फटकून. सगळं काही पैशात मोजलं जातं पण आपण हे विसरून जातो की पैसा हे एक चिन्ह आहे, खऱ्या जगात त्याचं अस्तित्व नाही. तसंच तंत्रज्ञानाचंही मानवाचे कित्येक प्रश्न सोडवण्यासाठी रोज नवनवीन तंत्रज्ञान शोधले जात आहे, पण मुळात ते प्रश्न निर्माण कोणी केले हे कोणी तपासून पाहत आहे काय? आजचं तंत्रज्ञान जे प्रश्न सोडवतं त्यातले बहुसंख्य प्रश्न हे कालच्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेले आहेत. तरीही आज आपण अधिकाधिक तंत्रज्ञानावर अवलंबून राहत आहोत. यंत्रांच्या गर्दीत आपण इतके हरवून गेलोय की माणसामाणसातला संवादच आज हरवतोय. आज शास्त्रज्ञ कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन करत आहेत आणि आपण ही सहज बोलताना असं म्हणतो की 'संगणक विचार करतोय' वगैरे. यात आपल्याला काहीच गैर अथवा विचित्र वाटत नाही. कित्येकाना तर माणसासारख्या दिसणाऱ्या यंत्रमानवांची गोड स्वप्ने ही पडू लागलीत. पण त्याचवेळी आपणच यंत्रांसारखेच होत चाललोय हे आपल्या लक्षात येत नाही. एका चाकोरीतले आयुष्य, रोज उठणे कामावर जाणे, पैसा कमावणे आणि थोडाफार आपापल्या मगदुराप्रमाणे नियंत्रित कलंदरपणा करणे हेच सगळ्यांचं साचेबद्ध आयुष्य झालं आहे. आज जी जीवनपद्धती आहे तिला काहीच पर्याय नाही असं आपलं एक गृहीतक आहे. पण तसं नाहीये...याला पर्याय आहे. आपण आपल्याच निर्माण केलेल्या फुग्यात राहात असताना बाहेर एक नैसर्गिक जग अजूनही आहे. आपण ठरवलं तर सगळं कृत्रिम जग नष्ट करून पुन्हा निसर्गाच्या कुशीत जाऊन एक शांत, परिपूर्ण आणि अर्थपूर्ण जीवन जगू शकतो.निर्णय आपल्या हाती आहे. पृथ्वी वाचवा पृथ्वी वाचवा असा टाहो फोडत वरवरची मलमपट्टी करत एक दिवस भीषण आयुष्याला सामोरं जायचं की वेळीच शहाणं होऊन मार्ग बदलायचा आणि स्वतःला वाचवायचं?

2 comments:

  1. छान लिहिलतं. ब्लॉगची सुरुवात मस्त झाली आहे.

    ReplyDelete
  2. स्वतःची सोबत स्वीकारता न येण्याचे हे परिणाम आहेत.

    ReplyDelete